अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील पूज्य सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक उभारणीत होणारा विलंबा बाबत ट्रस्ट चे विश्वस्त अ गो सराफ यांची प्रतिक्रिया वाचली, खरे तर उत्सवमूर्ती व उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या कामचलाऊ पदाधिकारिनी जागा अडविल्यानेच सानेगुरुजी स्मारक अद्याप होऊ शकले नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
गुरुजींचे स्मारक हे साऱ्या खानदेशवासीयांचे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यात जितकी शासनाची उदासीनता तितकीच गुरुजींचे वारसदार म्हणून फक्त इव्हेंट करणाऱ्या पदाधिकारी व गुरुजी भक्तांची बेदरकारी देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्र सेवादल, छात्रभारतीचे एके काळी पुर्णवेळ कार्यकर्ते राहिलेल्या धनंजय सोनार यांनी केला आहे!
अमळनेर येथील पू सानेगुरुजी स्मारकाचे काम तडीस लागावे म्हणून माजी आमदार दिवंगत गुलाबराव पाटील यांनी गती देण्याचा प्रयत्न केला त्या पलीकडे या स्मारका कडे शासन/ राजकीय नेते यांचे सफशेल दुर्लक्ष झाले, परंतु गुरुजींची जयंती, पुण्यतिथी आली की प्रसिद्धी पत्रक काढून स्मारकाचे कामाची ओरड करणारे खऱ्या अर्थाने कोणता वारसा चालवीत आहेत? एखादा अपवाद वगळता सानेगुरुजी यांचे विचार प्रसाराचे काम कुणीही करताना दिसत नाही, कागदावर काम दिसत असेलही प्रत्यक्ष तालुक्यातील जनतेला दिसेल समजेल असे कोणतेही काम साने गुरुजी स्मारक समितीच्या वतीने होत नाही ही वस्तूस्थिती कुणीही नाकारणार नाही.
टीम अरविंद सराफ, अनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सेवादल नेते गोपाळ नेवे व ट्रस्ट वर असलेले पदाधिकारी पावसाळ्यात छत्री उघडावी तसे दिसतात. अमळनेर राष्ट्र सेवादलाचे कार्य पूर्ण पणे बस्त्यात बांधले गेले आहे, 14 ऑगस्ट ला रात्री अर्धा तास होणारा इव्हेंट वगळता गुरुजींचे अमळनेर सेवादल मृतावस्थेत आहे! अन्य कोणतीही चळवळ सुरू नाही.
सर्वच पदाधिकारीं आपापल्या व्यवसायात मस्त असताना अन्य तरुणांना जबाबदारी द्यावी या साठी मात्र पुढाकार न घेता पदे अडवून बसले आहेत, झाडे लावणे व जयंती पुण्यतिथीला गुरुजींच्या नावाने स्मारकाची बोंब ठोकणे हा एक कलमी कार्यक्रम राबविला जात आहे. पू साने गुरुजी यांची विचारधारा मांडणारे किती उपक्रम ही मंडळी चालवीत आहे? असा सवाल करतानाच तमाम सानेगुरुजी प्रेमीनि या उपक्रमा कडे पाठ फिरविली याचे कारण पदे अडवून बसलेले निष्क्रिय पदाधिकारी व त्यांचे मूठभर समर्थक असल्याचा आरोप देखील धनंजय सोनार यांनी केला आहे.
सेवादल, छात्रभारती, आंतरभारती, सानेगुरुजी कथामाला आदी अनेक संस्था, संघटनात कार्यरत व आजही विविध सामाजिक उपक्रमात सहभागी तरुणांची मोठी फळी अमळनेरात असताना हे मूठभर लोक हेकेखोर पणे पदाला चिकटून बसले असल्याने तरुणाईने या ऐतिहासिक उपक्रमाकडे पाठ फिरवली आहे. एक ना धड भाराभर चिंध्या असे सर्वच संघटना, संस्थात्मक कामात नेते, विश्वस्त, सल्लागार, मार्गदर्शक म्हणून मिरविणारे लोक बोटे दाखवून जातात, काही निधी गोळा करीत असल्याचे म्हणतात तर तरुणाईला मात्र फक्त झाडे लावावे म्हणून बोलावतात. सूत्रे आमच्याच हाती असावेत हा हेका का?
अमळनेर राष्ट्र सेवादलाचे काम कागदावर, जिल्ह्यातील छात्रभारती अजिबात बंद, चळवळीचे अन्य कोणतेही काम नाही, साने गुरुजी विचार प्रसार करणारे कोणतेही कार्यक्रम नाही मात्र स्मारक उभारणी साठी यांना निधी हवा? तरुणाईला संधी देत नसलेले हे प्रस्थापित गुळाला चिकटावे तसे चिकटून बसले आहेत. स्मारक उभे झालेच तर कोणते भव्य दिव्य उपक्रम राबविणार आहेत.? काय योजना आहेत? अन त्याची पूर्वतयारी म्हणून आजवर जयंती पुण्यतिथी व्यतिरिक्त कोणते व किती उपक्रम राबविले? याचा जाब त्यांनी दिला पाहिजे.
गुरुजी ही आम्हा सर्वांची अस्मिता आहे आणि खरेच गुरुजींवर प्रेम असेल तर तरुणाईला का पुढे आणत नाहीत? नवनवीन उपक्रम का राबवित नाहीत? जयंती पुण्यतिथी शिवाय हे कधी गुरुजींच्या पुतळ्या कडे फिरकत नाहीत, अशा जागा अडवून कोरडा उपदेश करणाऱ्या काही लोकांनी साहित्य संमेलनाचे निमित्ताने पुन्हा बोंब ठोकली असून खऱ्या सानेगुरुजी प्रेमींचे या कामचलाऊ निष्क्रिय पदाधिकारी बद्दल आक्षेप आहेत.
अविनाश पाटील, गोपाल नेवे, चेतन सोनार सह अनेकांचे बैठकीत भाषणे ठोकणे व प्रासंगिक उपस्थिती व्यतिरिक्त कोणतेही योगदान नाही, अरविंद सराफ, चेतन सोनार, भारती गाला आदी एकतर वयाने निवृत्त झाले आहेत, किंवा आपआपल्या व्यवसायात तरी गुंतले आहेत. तरुणांना संघटित करणे व उपक्रम राबविणे ही यांचे ‘बस की बात’ राहिली नसताना यांनी वर्षातून दोन वेळा गुरुजींच्या नावाने शंख करणे हा चळवळीवर अन्याय आहे असा आरोप देखील धनंजय सोनार यांनी केला आहे.
संदीप घोरपडे, अशोक पवार असे चळवळीतील काही लोक अहोरात्र विविध उपक्रम राबवून गुरुजींचा वारसा चालवीत आहेत त्यांचे सह अनेक तरुणही सक्रिय आहेत, वेळ द्यायला तयार आहेत. त्यांना सहभागी करायला हवे, पुणे मुंबईतून सूत्रे हलवायची व श्रेय घ्यायचे हे या पुढे चालणार नाही. १४ ऑगस्ट चा रात्रीचा अर्धा तास इव्हेंट,जयंती, पुण्यतिथी व प्रासंगिक बैठकांना बोटे दाखवणे ही गुरुजी प्रेमींना अपेक्षित चळवळ नाही. गुरुजींची अमळनेर कर्मभूमी कायम आठवणीत राहावी म्हणून आदर्श स्मारक व्हायचे असेल तर या सर्व पदाधिकारीं व त्यांचे मूठभर समर्थकांनी व्यापक बैठक बोलावून राजीनामे द्यावेत, नव्या दमाच्या प्रामाणिक लोकांच्या हाती सूत्रे द्यावीत व प्रामाणिकपणे मार्गदर्शक म्हणून खंबीरपणे उभे राहावे तरच स्मारक हा जिव्हाळ्याचा विषय होईल.
अन्यथा 4 म्हाताऱ्या लोकांचे फलक लागलेले गुरुजींच्या नावाचे फलक लागलेले एक केंद्र धूळ खात पडेल ही खंत असल्याने मी चळवळीत अर्धे अधिक आयुष्य खर्ची करणारा म्हणून सडेतोड बोललो व यास गुरुजींचे स्मारक उभे राहावे म्हणून इच्छा असलेल्या अनेकांचे समर्थन आहे असा दावा देखील धनंजय सोनार यांनी केला आहे. गुरुजींच्या स्मारका बाबत अत्यन्त सडेतोड प्रतिक्रिया देणारे धनंजय सोनार 1983 ते आज अखेर राष्ट्रसेवादल छात्रभारती, अनिस, कथामाला, पुरोगामी संघटना व गुरुजींच्या विचाराला चालना देणाऱ्या कामात सक्रिय आहेत. म्हणून त्यांच्या प्रतिवादाची दखल घेतली जाईल हे नक्की!