जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याने राहाता शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या महिण्याभरापासून बेपत्ता असलेल्या गौरव शिरसाठ याची मित्रानेच मारहाण करून हत्या केल्याचं स्पष्ट झालं असून आरोपीला पोलीसांनी जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील ३० वर्षीय गौरव पंडित शिरसाठ हा तरुण महिनाभरापूर्वीपासून बेपत्ता असल्याने त्याच्या आई वडिलांनी राहता पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा पोलीस तपास करीत असतांना गौरव शिरसाठचा मित्र किरण मोरेही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरुन पोलिसांनी किरण मोरेचा शोध घेण्यास सुरूवात केली. किरण मोरेला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी केली असता त्यानेच गौरव शिरसाठची हत्या केल्याचे कबुल केले. किरण मोरेने गौरव शिरसाठ याची लाकडी दांडक्याने मारुन निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी किरण बबन मोरे या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे.. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले असून ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.