जळगाव मिरर | १ जानेवारी २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत असतांना नुकताच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यातील ताम्हिणी घाटात पर्यटनासाठी जात असताना झालेल्या बस अपघातात शहादा तालुक्यातील मंदाणे येथील सुरभी रवींद्र मोरे (वय २२) व कांचन मारुती पाटील (वय २०) या दोघांचा तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी पुण्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन चाललेल्या खासगी बसचा शनिवारी भीषण अपघात होऊन दोन तरुणी ठार, तर ५७ जण जखमी झाले. जखमींमध्ये मंदाणे येथील अन्य दोघांचा समावेश आहे. मंदाणे येथील सुरभी मोरे, लक्ष्मी मोरे यांनी या २० डिसेंबरला पुणे येथील सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर येथील एसीएच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मुलाखत दिली होती. त्यात त्यांची निवड होऊन ते २४ डिसेंबरला त्या कंपनीत रुजू झाले होते. त्यानंतर पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
सुरभी व लक्ष्मी या दोघींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे कंपनीची सहल निघाली होती. सहलीच्या स्थळापर्यंत पोचण्याआधीच अवघ्या तीन तासांच्या प्रवासानंतर ताम्हिणी घाटात बसचा अपघात झाला. यात सुरभीचा मृत्यू झाला. मृत सुरभी मोरे हिच्यासाठी चांगले स्थळ मिळाले होते. सहलीहून परतल्यावर मंदाणे गावी ती आल्यावर विवाह निश्चित करण्यात येणार होता. त्या अगोदरच क्रूर काळाने झडप घालून सुरभीला हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.