जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२४
देशातील अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जंगी तयारी सुरु असून येत्या २२ जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठाण सोहळा पार पडणार असल्याने या सोहळ्याचे देशातील मान्यवरांना निमंत्रण दिलं जात आहे. या सोहळ्याचं निमंत्रण राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील देण्यात आलं आहे. मात्र शरद पवार २२ जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहे. तसं पत्र लिहून त्यांना कळवलं आहे.
शरद पवार यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र,आयोध्या महासचिव चंपत राय यांना पत्र लिहिलं आहे. शरद पवारांनी 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या आमंत्रणासाठी पत्राच्या माध्यमातून महासचिव यांचे आभार व्यक्त केले. मोठ्या संख्येने या ठिकाणी रामभक्त येथील त्यामुळे 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आपण येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. माझं अयोध्येला येणे नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम देखील पूर्ण झालं असेल, असाही पत्रात उल्लेख आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांना मला निमंत्रण मिळालं, त्याबाबत मी आभारी आहे. प्रभू श्रीराम भारतच नाहीतर, जगभरातील कोट्यवधी भक्तांची श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक आहेत. अयोध्येतील कार्यक्रमाबाबत रामभक्तांमध्ये उत्सुकता आणि आतुरता आहे. मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत येत आहेत.
त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल. २२ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर रामलल्लाचं दर्शन सहज घेता येईल. माझा अयोध्येला येण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. त्यावेळी श्रद्धेने श्री रामाचं दर्शन घेईन. तोपर्यंत राम मंदिराचं बांधकाम देखील पूर्ण होईल. तुम्ही दिलेल्या निमंत्रणाबद्दल मी पुन्हा एकदा आभारी आहे. कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असं शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.