जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना जळगाव तालुक्यात देखील अपघाताची मालिका सुरु आहे. ड्युटी संपल्यानंतर कामावरून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारांना समोरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पंकज राजेंद्र मराठे (वय ३४, रा. कानळदा, ता. जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला गोपाल वसंत पाटील (वय २९, रा. कानळदा, ता. जळगाव) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास जळगाव ते कानळदा रस्त्यावरील वळणावर झाला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कानळदा येथील पंकज मराठे हा तरुण जळगावातील एका गादी कारखान्यात कामाला होता. शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री तो त्याचा मित्र गोपाल पाटील याच्यासोबत (एमएच १९, ईसी ८८२५) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव येथून कानळदा येथे घरी जाण्यासाठी निघाले. आव्हाणे गावाच्या पुढे गेल्यानंतर कानळदा रोडवरील एका वळणावर कानळदाकडून येणाऱ्या (एमएच १४, पी १५६०) क्रमांकाच्या कारने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले अपघातानंतर दुचाकीवरील दोघ जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता, पंकज मराठे याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. तसेच गंभीर जखमी गोपाल पाटील याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच रात्रीच्या सुमारास पंकज मराठे याच्या नातेवाईकांसह मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली होती. तसेच सकाळी देखील त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जात असलेल्या कारचालकाने दुचाकीस्वारांना धडक दिली. धडक दिल्यानंतर कारचालक गिरीश राणे रा. कानळदा हा कार सोडून तेथून पळून गेला. याप्रकरणी संदीप मराठे यांच्या फिर्यादीवरुन अपघातातील मयताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास धनराज पाटील हे करीत आहे.