जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४
नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार चालू करतांना विजेच्या शॉक लागल्याने संदीप हिरामण भालेराव (वय ३८, रा. वाघनगर) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. २७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदीप यांना मयत घोषीत करताच त्याच्या कुटुंबियांकडून मनहेलावणारा आक्रोश केला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाघ नगर परिसरात संदीप भालेराव हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शहरातील एका शाळेत ते शिपाई म्हणून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरात पिण्याचे पाण्याचे नळ आलेले होते. त्यावेळी घरी असलेल्या संदीप यांनी पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार लावली. मोटार सुरु करण्यासाठी गेले असता, त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना कळताच परिसरातील नागरीकांनी संदीप यांच्या घराकडे धाव घेत त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले.
संदीप यांना विजेचा शॉक लागल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह मित्रांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी संदीप भालेराव यांना मयत घोषीत करताच त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.