जळगाव मिरर | राजकीय विशेष
येत्या दोन दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असतांना जळगाव लोकसभा मतदार संघात अजून देखील उमेदवार निश्चित न झाल्याने कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील महायुतीतील भाजप व महाविकास आघाडीतील ठाकरे गट ही जागा लढविण्यास निश्चित झाली असून उमेदवाराची चाचपणी मात्र सुरु आहे.
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे भाजप व ठाकरे गट आज देखील वेट अॅण्ड वौचच्या भूमिका घेत असतांना दिसत आहे. तर भाजपकडूनही निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगाव दौरा करीत युवकांशी संवाद देखील साधला तर ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघात एकाच दिवशी चार सभा घेतल्याने जळगावात भाजप व ठाकरे गटात जोरदार लढत होणार असल्याचे समजते. जळगाव लोकसभा मतदार संघात उन्मेष पाटील हे सध्या खासदार आहे पण पक्षामधून यांच्या नावाला विरोध असला तरी देखील भाजप हायकमांड त्यांच्याकडे सकारात्मक असल्याचे समजते. तर भाजपकडून स्मिता वाघ यांचे देखील नाव चर्चेत आहे. वाघ यांना दांडगा राजकीय अनुभव, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची देखील धुरा त्यांनी यशस्वी सांभाळलेली होती तर विधान परिषदेवर देखील त्यांनी काम केले आहे. त्यामुळे माजी आ.स्मिता वाघ यांचे देखील नाव आग्रही असल्याचे समजते.
शिवसेनेच्या ठाकरे गटातील जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्यानंतर आता जळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे नाव जोरदार चर्चेत असून त्यांनी देखील भाजपमधून बंडखोरी करून मनपात ठाकरे गटाची सत्ता आणली होती. जळगाव शहरात त्यांचा दांडगा संपर्क आहे मात्र बाकीच्या तालुक्यात त्यांना मेहनत करावी लागणार आहे. तर जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांचे देखील नाव चर्चेत आहे. पण त्यांना देखील जिल्हा परिषद सदस्य असल्याने अनुभव आहे. मात्र त्यांचा थेट जनतेशी संपर्क पारोळा व एरंडोल मतदार संघात चांगला आहे, त्यांना आणखी जळगाव जिल्ह्यात संपर्क वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात उमेदवारी जाहीर होणार असून भाजपकडून कुणाला मिळणार संधी तर ठाकरे गट कुणाला देणार उमेदवारी ?