जळगाव मिरर | १४ मार्च २०२४
मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव जिल्ह्याचे सर्वात मोठे व नामवंत महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते, या विषयात विद्यार्थी परिषदेने वारंवार निवेदनाच्या माध्यमातून महाविद्यालय प्रशासनाला समस्यांची माहिती देत त्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. परंतु प्रशासनाने या प्रश्नांवर कुठलीही सकारात्मक भूमिका घेतली नाही.
अनेकदा विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधीनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेतली, पण त्यातूनही कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका महाविद्यालयाने घेतली नाही. परिणामी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालय बंदाची हाक देत महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. यामध्ये परिक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अमाप घेतली जाणारे शुल्क हे नियमानुसार कमी करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांना पुन: परीक्षेची संधी देण्यात यावी या मुख्य मागण्या यावेळी विद्यार्थ्यांच्या होत्या. अनेक तास विद्यार्थी उन्हामध्ये मुख्य प्रशासकीय इमारती समोर बसून होते, अनेक विद्यार्थ्यांना उन्हाचा व एका विद्यार्थ्याला फिटचा त्रास झाला.
शेवटी महाविद्यालय प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत मागण्यांवर काही वरिष्ठ प्राध्यापकांची समिती गठित करुन परीक्षेदरम्यान व निकालाआधी सर्व गोष्टींचा विचार व अभ्यास करून योग्य तो निर्णय समिती घेईल असे सांगितले. प्राचार्य भारंबे यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय होईल असे आश्वासन दिल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे, महानगर मंत्री मयूर माळी, महानगर सहमंत्री भाविन पाटील, महाविद्यालय अध्यक्ष यशराज देशमुख, महाविद्यालय मंत्री चिन्मयी बाविस्कर, स्नेहा मोरे, हर्षदा पाटील व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते