जळगाव मिरर | १५ मार्च २०२४
पाचोरा तालुक्यातील विष्णू नगरात पोलीस दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने मुलाच्या डोक्यात शेतीच्या लोखंडी अवजाराने वार करीत गंभीर जखमी केले. यामध्ये कन्हैया अजमल चव्हाण (वय २५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी अजमल चव्हाण यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील विष्णुनगर (गाळण) येथे अजमल यमजी चव्हाण हे मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दि. १३ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अजमल चव्हाण यांचे त्यांची पत्नी गंगाबाई चव्हाण यांचेशी किरकोळ कारणावरून वाद झाले. रागाच्या भरात अजमल चव्हाण यांनी शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणारे वखरणीचे पास हातात घेऊन त्यांना मारण्यासाठी गेले. परंतु त्या दुसऱ्या खोलीत निघून गेल्यानंतर त्या खोलीत त्यांचा मुलगा कन्हैया चव्हाण हा झोपलेला होता. अजमल चव्हाण हे पत्नी व कन्हैया यांना उद्देशून तुम्ही माझ्या जिवावर मातले आहे. असे म्हणत हातातील वखरणीचे पास थेट झोपलेल्या कन्हैया याचे डोक्यात मारले. यामध्ये कन्हैया हा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता.
मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे दिसताच गंगूबाई यांनी आरडाओरड केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या घराकडे धाव घेत जखमी कन्हैया याला रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अजमल यमजी चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गगणे हे करीत आहे