जळगाव मिरर | १७ मार्च २०२४
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जंरांगे पाटील यांची राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दि.१६ रोजी रात्री उशिरा भेट घेतली आहे. यावेळी अशोक चव्हाण यांनी आपल्या गाड्यांचा ताफा 15 किलोमीटर दूर ठेवला होता. रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास मनोज जारंगे पाटील गेवराई तालुक्याचा दौरा करून आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी एका साध्या स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
या दरम्यान जरांगे पाटील आणि त्यांच्याशी सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण यांनी मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील यांनी 900 एकरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आव्हान केल्यानंतर राजकीय नेत्यांना अंधारात भेट घेण्याची वेळ का आली आहे? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
मात्र या भेटीदरम्यान काय चर्चा झाल्या याबाबत कोणतीही माहिती सामोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. भाजप खासदार अशोक चव्हाणांनी मध्यस्तीसाठी जरांगेंची भेट घेतली असावी अशाही चर्चा होत आहेत.