जळगाव मिरर | २२ मार्च २०२४
जळगाव गावात जाऊन येतो असे सांगून घरातून निघालेल्या देवेंद्र रामकृष्ण कोल्हे (वय २७, रा. भादली, ता. जळगाव) या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना दि. २१ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद फाट्याजवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली येथे देवेंद्र कोल्हे हा तरूण आपल्या आईवडील, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. बुधवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता गावात जावून येतो असे सांगून देवेंद्र हा घरातून निघाला होता. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने गुरूवार दि. २१ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद रेल्वे फाट्यादरम्यानच्या रेल्वे रूळावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न दाखल करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. मयत तरूणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी कोमल आणि दोन मुले असा परिवार आहे.