जळगाव मिरर | २३ मार्च २०२४
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर झाले असून काही मतदार संघात मात्र अद्याप उमेदवार जाहीर झाले नाही, तोवर महायुतीमध्ये आता ठिणगी पडली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी थेट महायुतीला इशारा दिला आहे.
अमरावती मतदार संघात नवनीत राणा यांच्या उमेदवारीला प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रचंड विरोध केला आहे. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदार संघाचा तिढा वाढला आहे. अमरावतीच्या आमच्या मतदार संघात माझे दोन आमदार आहेत. किमान एक लाख मते आमची आहेत. खरं तर आम्ही येथे दावा करायला हवा होता. परंतू आम्ही प्रामाणिकपणे काम करायला गेलो. परंतू हे थोडे अंगलट येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही आता अडचणीत येतोय असे वाटायला लागले आहे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. सुरुवात त्यांनी केली तर आम्ही शांत बसणार नाही. तुम्हालाच ठेवायचे नाही तर आम्ही काय एवढे गुलाम नाही, लाचार नाही. वेळ पडली तर महायुतीतून आपण बाहेर पडू असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. खरं तर आम्हाला महायुतीत रहायचे होते. परंतू तुम्ही जर असे वागलात तर आम्हालाही पर्याय उघडे असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.