जळगाव मिरर | २७ मार्च २०२४
सकाळीच पती व सासरे धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले असतांना जयश्री अमित महाजन (वय २३, रा. नशिराबाद) या विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवार दि. २५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तीन वर्षाच्या लहान मुलीच्या रडण्याच्या आवाजामुळे उघडकीस आली, विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराचाद येथे जयश्री महाजन या विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. त्यांचे पती अमित महाजन हे खाजगी व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी दि. २५ मार्च रोजी धुलीवंदनानिमित्त गल्लीतील मुले रंग खेळत होते तर दुसरीकडे त्यांचे पती व सासरे हे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या नातेवाईक परिवारातील सदस्यांसोबत सकाळीच निघालेले होते. त्यामुळे जयश्री महाजन या तीन वर्षांची लहान मुलगीसोबत घरी एकटेच होत्या. यावेळी त्यांनी घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर त्यांची तीन वर्षाची लहान मुलगी रडायला लागली. बराच वेळ झाला मुलगी रडत असल्याचा आवाज शेजान्यांना आला. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली त्यांनी कुटुंबीय व नातेवाईकांना ही घटना सांगितली, वरम्यान जयश्री महाजन यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विवाहितेच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. विवाहितेच्या पश्चात पती, लहान मुलगी, सासरे असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.