जळगाव मिरर | २८ मार्च २०२४
भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बसने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार दि. २७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ममुराबाद रस्त्यावर घडली. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा आगाराची (एमएच १४, बीटी २२१६) क्रमांकाची बस प्रवासी घेवून ममुराबादमार्गे चोपड्याकडे जाण्यासाठी निघाली. तर आलम – शेख (वय २८) आणि सादिक जुम्मा पिंजारी (वय २०, दोघे रा. आझाद नगर, पिंप्राळा) हे दोघे रोजा सोडण्यासाठी बुधवारी दि. २७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास (जीजे ०६ केई ०५४२) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावला येत होते. भरधाव बससमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने पुढील दुचाकीला जबर धडक दिली व त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली.
या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्रसिंग पाटील, हरीष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या आलम शेख व सादिक पिंजारी या दोघांना लागलीच तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे दोघांवरही उपचार सुरू आहेत. भरधाव बस झाडावर आदळल्यामुळे सुदैवाने बसमधील प्रवशांना कुठलीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहने ताब्यात घेतले, यामध्ये दुचाकीचा पुर्णपणे चुराडा झाला आहे