जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२४
२०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीत लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढली. जनतेने युतीला कौल दिला. मात्र जनतेचा कौल नाकारून, बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्यासोबत केल्याचा घणाघाती शाब्दिक प्रहार यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी ते गुरुवारी यवतमाळमध्ये आले होते. यावेळी समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे आयोजित सभेत त्यांनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले. पुढे बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांना काँग्रेससोबत जाणे कधीच मान्य नव्हते. मात्र बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याने आम्ही उठाव केला. सरकार येताच अडीच वर्षापर्यंत सर्व काही बंद, ठप्प पडलेली कामे, सण, उत्सव सुरू केले. पूर्वीचे सरकार उंटावर बसून शेळ्या हाकणारे आणि फेसबुक लाइव्हचे होते. आताचे सरकार २४ बाय ७ काम करणारे आहे.
नोकरभरती सुरू करून रोजगार देण्यात आले. विविध योजना राबवण्यात येत आहेत. केंद्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सहा हजार देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने जळफळाट झाला आहे. मात्र विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देण्यात येईल, असे शिंदे म्हणाले. देशाला देशभक्त आणि राष्ट्रभक्त पंतप्रधान लाभले आहे. नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबवून महिला, शेतकरी, युवा, कष्टकरी, सर्वसामान्यांचा सन्मान केला. ५० ते ६० वर्षात जे देशात झाले नाही, ते १० वर्षांत पहायला मिळत आहे. हा चमत्कार मोदींमुळे शक्य झाला असून, अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचवर आली. आता तीनवर आणण्याचा निर्धार आहे. त्यामुळे ‘फिर एक बार मोदी सरकार’ आवश्यक आहे.
ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे. देश महासत्ता बनवायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, असे शिंदे म्हणाले. देशात ‘चारशे पार’ बरोबरच राज्यात ‘४५ पार’ चा नारा शिंदे यांनी दिला. विरोधकांकडे अजेंडा नाही, झेंडा नाही, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री संजय राठोड, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा हेमंत पाटील, आ. मदन येरावार, आ. लखन मलिक, आ. प्रा. डॉ. अशोक उईके, आ. इंद्रनिल नाईक, आ. निलय नाईक, आ. किरण नाईक आदी उपस्थित होते.
