जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२४
इंडिया आघाडीत राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, या सर्व पक्षांचे प्रमुख स्वतःच इंजिन असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे इंडिया आघाडीच्या इंजिनला डबेच नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
वणी येथे शनिवारी आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचे इंजिन भक्कम आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपाइंचे रामदास आठवले आणि ज्यांचे चिन्ह इंजिन आहे त्या राज ठाकरेंची देखील साथ आहे. इंडिया आघाडीत मात्र दोन गट आहेत. २६ पक्षांची आघाडी असली तरी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, लालुप्रसाद यादव आदी प्रत्येक जण स्वतःच इंजिन असल्याचे सांगत आहे. कुणाचे इंजिन बारामती, कुणाचे मुंबई, तर कुणाचे पश्चिम बंगालच्या दिशेने आहे. सर्व जण इंजिन म्हणत असल्याने डब्बे कुठे आहेत?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. इंजिनमध्ये बसायला जागाच नसते. त्यात केवळ चालकच असतो. बसण्यासाठी डब्बे हवे असते, ते इंडिया आणि महाविकास आघाडीकडे नसल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या इंजिनला मात्र डब्बेच आहे, त्यामुळे प्रत्येक घटकाला बसण्यासाठी एनडीएच्याच गाडीत जागा आहे, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी चित्रा वाघ, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मनसे नेते राजू उंबरकर, चंद्रपूर आर्णी लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर आदी उपस्थित होते.