जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२४
देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. राजकीय पक्षांकडून या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. अनेक पक्षांचा सोशल मीडियावर प्रचाराचा मोठा भर दिसत आहे. या लोकसभेच्या धामधुमीदरम्यान, ठाकरे गटाकडून मशाल गीत लाँच करण्यात आलं आहे. मशाल गीत लाँच करताना मशालीने हुकूमशाही भस्म करायची, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
आज मंगळवारी ठाकरे गटाकडून मशाल गीत लाँच करण्यात आलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. ‘मशाल हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलं आहे. मशाल चिन्हाचा विजयाची सुरुवात अंधेरी पोटनिवडणुकीने सुरुवात झाली आहे. आम्ही आता सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहोत. मशाल हे चिन्ह महाराष्ट्रात पोहोचलं आहे. हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाच्या जाहीरनाम्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी पेपर फोडणार नाही. एकेक टप्प्याने आम्ही जाणार आहोत. जाहिरातींचा कार्यक्रम आखतोय. संयुक्त सभा…जाहीरनामा आम्ही लवकरच प्रसिद्ध करू. काँग्रेसने देशातील जनतेसाठी जाहीरनामा केला आहे. त्यात महाराष्ट्रासाठी काही महत्वाचे मुद्दे असतील तर ते आम्ही त्यात सामील करू’.
विशाल पाटील यांच्या सांगलीतील उमेदवारीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्हाला काही फटका बसणार नाही. हुकूमशाही विरोधात जनमत झालं आहे, लोक फक्त मतदानाची वाट बघत आहेत. जागावाटप जाहीर झालं आहे. आता जर बंडखोरी होत असेल, तरी त्या-त्या पक्षाने बघावं’. महायुतीच्या राज्यातील जागा जिंकण्याच्या दाव्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘महाविकास आघाडी 48 जागा जिंकणार आहे. त्यांचा 45 हा आकडा देशाचा आहे. माझा आकडा हा महाराष्ट्राचा सांगितला आहे’.