जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२४
यावल तालुक्यातील शिरागड येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन युवकांचा तापी नदीत अंघोळीसाठी उतरले असता पाण्यात बुडून या दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना १५ एप्रिलला दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. जळगाव- यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदीच्या काठावर हे मंदिर असून चैत्र नवरात्री उत्सवानिमित्ताने अनेक भाविक दर्शनासाठी जातात. दरम्यान, १५ एप्रिलला दुपारी येथे जळगावातील रहिवाशी असलेले रोहन काशिनाथ श्रीखंडे (वय १७) व प्रथमेश शरद सोनवणे (वय १७) हे दोघे गेले होते. त्यांनी देवीचे दर्शन घेतले व त्या नंतर ते तापी नदीत अंघोळ करण्यास गेले असता नदीत उतरले.
दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही खोल पाण्यात बुडाले. आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले व यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
