जळगाव मिरर | २० एप्रिल २०२४
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे स्वतःची दुचाकी चोरीला गेल्याचा राग मनात ठेवत राजु रामदास माळी रा. पाचोरा याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. त्याच्या कडून पहुर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करीत त्याचा पर्दाफाश केला. त्या संशयिताला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील मेणगाव येथील ईश्वर नामदेव मोहणे यांची दुचाकी दि. १६ एप्रिल रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तपासधिकारी सहा. फौजदार शशिकांत पाटील यांना ही दुचाकी पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावातील राजू माळी याने चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी पोलीस उप निरीक्षक दिलीप पाटील, सहा. फौजदार शशिकांत पाटील, पोकॉ प्रशांत बडगुजर, निखील नारखेडे, विजयकुमार पाटील, संदीप पाटील, सोमनाथ आगोणे, होमगार्ड मनोज गुजर, निलेश धनगर यांचे पथक तयार करुन रवाना केले. या पथकाने सापळा रचून मेणगांव, जामनेर येथून सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.