जळगाव मिरर | ३ मे २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु झाला असून त्यासाठी प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यत पोहचण्यासाठी मोठा प्रयत्न करीत आहे. राज्यातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये पुन्हा परत येण्याची घोषणा केली. मात्र त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त काही अद्याप ठरलेला नाही. अशातच आता माझा पक्षप्रवेश झाल्याचे म्हणत ते सुनेच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत. पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला प्रवेश झाल्यासारखे असल्याच सांगितले असल्याने आपण भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारात सक्रिय झालो असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मंत्री व जेष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी यावल येथील भाजपा प्रचार कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांना सूचना देत आढावा घेतला. भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप प्रचारात सक्रिय झाले नव्हते. मात्र दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झाल्याचे त्यांनी सांगितले.
“मी वरिष्ठांकडे माझ्या भाजप प्रवेशाबाबत मी सूचित केले होते. त्यानुसार भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे तसेच भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार? असे त्यांना विचारले असता त्यांनी प्रवेशाची तारीख कळवणार असल्याचे सांगून तुमचा प्रवेश झालेलाच आहे. बैठका घेण्यास व प्रवास करण्यास हरकत नाही, असं सांगितल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
“त्यानुसार मी गेल्या दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झालो असून यवला हे माझे प्रचारार्थ आठवे गाव असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणूक मतदार संघ अंतर्गत भाजपा उमेदवारास किती लीड मिळेल यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे मतदारांचे मतदानाचे प्रमाण यावर लीड अवलंबून असेल तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रक्षाताई खडसे प्रचंड बहुमताने निवडून येतील असेही ते म्हणाले.