जळगाव मिरर | ५ मे २०२४
राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३०४ येथे रविवारी पहाटेच्या सुमारास एका चारचाकी कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अनुज राम मेहेर, लताबाई पुरुषोत्तम मेहेर, अत्मजा मुनोरबोद अशी मृतांची नावे आहेत. अपघातात दोनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतक आणि जखमी छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचं समोर येतं आहे. महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.