जळगाव मिरर | ९ मे २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात भाजप व ठाकरे गटाचा प्रचार जोरदार सुरु असताना ठाकरे गटाला आता एक मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. आता माजी मंत्री जैन कोणत्या पक्षात जाणार यावर जिल्ह्यातील जनतेत मोठी चर्चा सुरु झाली आहे.
जळगावात लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारचे वारे अगदी न्जोरात वाहतांना दिसत आहेत. मात्र मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक असतांना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
गेली दहा वर्ष राजकारणापासून दूर झालेले जळगावचे माजी आमदार, माजी मंत्री सुरेशदादा जैन हे गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपण पुन्हा राजकारणात परतणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आणि आज मात्र त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे त्यांचा नक्की काय हेतू आहे? दुसऱ्या पक्षात प्रवेश ? कि, त्यांना राजकारणातून संन्यास घ्यायचा आहे का? हे पुढे स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.