जळगाव मिरर | १० मे २०२४
शहरातील मिटींगसाठी आलेले डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर हे रात्री जेवण झाल्यानंतर मित्राला भेटण्यासाठी एका हॉटेलात गेले. तेथून परततांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने डॉ. हर्षद भाऊराव लांडे (वय ४३ रा. गोरवले रोड, पोर्तुगीज चर्चजवळ, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हॉटेल रॉयल पॅलेस समोर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर डॉ. हर्षद लांडे हे वडील, पत्नी आणि मुलगा यांच्या सोबत मुंबई येथील पोर्तुगीज चर्चजवळ वास्तव्याला होते. बुधवार दि. ८ मे रोजी मध्यरात्री १ वाजता ते डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या मिटींगसाठी ते आपल्या टिमसह शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. दि. ८ मे रोजी दिवसभर त्यांनी मिटींगला हजेरी लावली. मिटींग आटोपल्यानंतर ते त्यांनी सहकाऱ्यांसोबत जेवण केले. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास ते आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक दरम्यान शतपावली करीत सागर पार्क जवळील एका हॉटेलमध्ये मित्राला भेटण्यासाठी गेले.
मित्राची भेट घेतल्यानंतर डॉ. हर्षद लांडे हे रस्ता ओलांडत असताना काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणीकडे जाणाऱ्या भरधाव कारने लांडे यांना धडक दिली. या धडकेत लांडे हे सुमारे १० ते १५ फुट अंतरावर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.