जळगाव मिरर | १२ मे २०२४
दररोज सकाळी टीव्हीवर एक पोपट येतो. त्याला विचारले, तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा नेता कोण आहे. तर तो म्हणतो, आमच्याकडे खूप नेते आहेत. पाच वर्षांत आम्ही पाच पंतप्रधान करू. मित्रांनो, इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी नेताच नाही. त्यामुळे तिकडे पंतप्रधानपदासाठी रोज संगीत खुर्चीचा खेळ होणार आहे. अशा प्रकारे जर संगीत खुर्चीचा खेळ झाला, तर देशाचा विकास कोण करणार आहे. त्यामुळे ही निवडणूक गल्लीचा नेता नाही, तर देशाचा नेता निवडायचा आहे. एकीकडे देशात दमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर दुसरीकडे काँग्रेसचे राहुल गांधी यांचे फक्त इंजिन आहे. त्यांच्याकडे डबेच नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २४ पक्षांची खिचडी तयार झाली आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे शिवाजीनगर भागातील कुसाळकर चौक येथे आयोजन केले होते. याप्रसंगी ना. चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जगदीश मुळीक, धीरज घाटे उपस्थित होते.