जळगाव मिरर | १५ मे २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तीविषयीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली. या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांकडे एकूण ३ कोटी २ लाख ६ हजार ८८९ रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही. तसेच त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही. मोदींकडे ५२,९२० रुपये रोख आहेत. स्टेट बँकेच्या गांधीनगरमधील शाखेतील खात्यात ७३ हजार ३०४ रुपये, तर एसबीआयच्या वाराणसीतील शाखेत ७ हजार रुपये आहेत. २ कोटी ८५ लाख ६० हजार ३३८ रुपयांची त्यांची मुदत ठेव (एफडी) आहे.
याशिवाय ९ लाख १२ हजार ३९८ रुपयांची राष्ट्रीय बचतपत्रांमध्ये गुंतवणूक आहे. पंतप्रधानांकडे ४ अंगठ्या आहेत. या अंगठ्यांचे वजन ४५ ग्रॅम, तर किंमत २ लाख ६७ हजार ७५० रुपये आहे. मोदींनी सादर केलेल्या पाच वर्षांच्या प्राप्तीकर परतावा विवरणानुसार त्यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात आपले उत्पन्न ११ लाख १४ हजार २३० रुपये दाखवले. २०१९-२० मध्ये १७ लाख २० हजार ७६० रुपये, २०२०-२१ मध्ये १७ लाख ७ हजार, ९३० रुपये, २०२१-२२ मध्ये १५ लाख ४७ हजार ८७० रुपये, तर २०२२-२३ मध्ये २३ लाख ५६ हजार ८० रुपये उत्पन्न दाखवण्यात आले आहे. २०१४ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मोदींची संपत्ती १ कोटी ६६ लाख इतकी होती. तर २०१९ साली त्यांनी आपली संपत्ती २ कोटी ५१ लाख असल्याचे दाखवले. याचाच अर्थ गत पाच वर्षांत त्यांच्या संपत्ती ५० लाख रुपयांची वाढ झाली आहे.
आपल्या शिक्षणाबद्दल मोदींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी १९६७ साली गुजरात बोर्डातून एसएससी केले. १९७८ साली दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. तर १९८३ साली गुजरात विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. मोदींवर कोणताही गुन्हा दाखल नाही. पत्नीच्या नावापुढे त्यांनी जशोदाबेन असा उल्लेख केला आहे.