जळगाव मिरर | २४ जून २०२४
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका ट्रकला लक्ष्य करत घडवून आणलेल्या आयईडी बॉम्बस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ‘कोबरा’ बटालियनचे दोन जवान शहीद झाले. राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी शहीद जवानांबद्दल एक्स या सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.
जिल्ह्यातील सिलगेर व टेकलगुडेम शिबिरादरम्यान टिम्मापूरम गावानजीक रस्त्याच्या कामाला सुरक्षा पुरवण्यासाठी सीआरपीएफच्या ‘कमांडो बटालियन फॉर रेझोल्युट एक्शन’ (कोबरा) च्या २०१ व्या तुकडीतील जवान तैनात केले होते. जगरगुंडी पोलीस ठाणे हद्दीतील सिलगेर शिबिरापासून गस्त सुरू केल्यानंतर जवान एक ट्रक व दुचाकीवरून प्रवास करत होते. दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमारास नक्षल्यांनी ट्रकला लक्ष्य करत आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात कॉन्स्टेबल शैलेंद्र (२९) व वाहनचालक विष्णू आर. (३५) हे दोन जवान शहीद झाले. नक्षली स्फोटानंतर अतिरिक्त सुरक्षा दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांचे मृतदेह जंगलातून बाहेर काढण्यात आले. नक्षल्यांच्या शोधासाठी या भागात तपास अभियान सुरू केल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.