चाळीसगाव : प्रतिनिधी
हल्ली विविध आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे अनेकांना रक्ताची नेहमीच गरज भासत असते. रक्त साठा कमी असल्याने अनेकदा नातेवाईकांची रक्तासाठी तारांबळ उडते. आपण माणूस म्हणून जन्माला आलो असल्याने माणुसकी जोपासणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करणे गरजचे आहे, असे प्रतिपादन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले, चाळीसगाव शहरातील पार्थ रेसिडेन्सी येथे भगवान महावीर जैन यांच्या जन्मोत्सवा निमित्त आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी बोलत होते.
यावेळी 61 रक्तदात्यांनी आपले स्वेच्छा रक्तदान केले. पुढे पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, रक्तदानामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते. शिवाय समाजात वावरत असताना आपले दायित्व आपण पार पाडत आहोत याचे समाधानही मिळते. तरुण पिढीनेही रक्तदान चळवळ सुरू करून विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून इतर तरुणांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, विशाल टकले, सागर ढिकले, वाहतूक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक तुषार देवरे, नगरसेवक रामचंद्र जाधव, भूषण ब्राह्मणकार, रोशन जाधव, दीपक बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज सोलंकी, हरेश जैन, संदीप जैन, प्रितेश कटारिया, पवन चोपडा, निलेश कांकरिया, रोशन गुलेचा आदींनी परिश्रम घेतले.