जळगाव मिरर | ३ जुलै २०२४
राज्यातील शिंदे सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी मोठी योजना सुरु केली असून ‘लाडकी बहीण’ योजनेेत अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६० वर्षांपर्यंतच्या महिलांना १५०० रुपये दरमहा अर्थसाह्य करण्याचा जीआर सरकारने काढला आहे. मात्र यातील काही जाचक अटींवर टीका झाली. तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने मुदतवाढीची मागणीही होत होती. त्यामुळे अर्ज नोंदणीस दोन महिने मुदतवाढीसह अनेक अटी शिथिल करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यापूर्वी विधानसभेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी योजनेतील त्रुटींवर बोट ठेवले.
अटींत बदल : कुटुंबातील एक अविवाहित महिलाही पात्र
अर्जाची मुदत १ जुलै ते १५ जुलै होती. ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली. मात्र मानधन १ जुलैपासूनच मिळेल.
अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला ग्राह्य.
५ एकरच्या आत शेतीची अट रद्द.
पात्र महिलांची वयोमर्यादा २१ ते ६० वर्षे होती. ती ६५ वर्षांपर्यंत वाढवली
परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पतीचा जन्म दाखला, शाळेचा टीसी, अधिवास प्रमाणपत्र दाखल केले तर ग्राह्य धरले जाईल.
पात्र कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही लाभ मिळू शकेल.
महिलांना अर्ज भरताना अडचणी; नवे नारीशक्ती दूत ॲप आणणार
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी १ जुलैपासून नारीशक्ती दूत ॲपवर नोंदणी सुरू झाली आहे. मात्र पहिल्या दोनच दिवसांत सर्वच जिल्ह्यात सर्व्हर डाऊन झाल्याने नोंदणीत अडचणी येत आहेत. त्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ॲपमध्ये दुरुस्ती करून सुधारित ॲप आणले जाईल, अशी माहिती या योजनेचे नगर जिल्ह्यातील समन्वयक नारायण कराळे यांनी दिली. तसेच दोन दिवसांत जुन्या शासन निर्णयात बदल करून नवीन जीआर काढला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नारीशक्ती दूत ॲपसंदर्भात मंत्रालय स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात अॅपच्या अडचणींवर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लाभार्थी महिलांचे परिपूर्ण अर्ज आल्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांमार्फत ॲप’द्वारे अर्ज भरले जातील. ‘लाडकी बहीण’ योजनेचे फाॅर्म भरण्यासाठी सेतू केंद्रांसमोर गर्दी होत आहे. नंदुरबारच्या महिलांनी भरपावसात अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली.