जळगाव मिरर | १२ जुलै २०२४
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरालगत नवीन राष्ट्रीय महामार्गावरील पहिलवान ढाब्याजवळ मुक्ताईनगरच्या बाजूने नादुरुस्त झालेल्या ट्रकवर भरधाव वेगात मागील बाजूने टँकर आदळल्याने दोन्ही वाहनांवरील चालकांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारा ट्रक (सीजी ०४, जेडी ०५१७) हा नादुरुस्त झाल्याने महामार्गावर उभा होता. या नादुरुस्त झालेल्या ट्रकला पाहण्यासाठी चालक नदीम नसीम खान (रा. नागपूर) हा ट्रक खाली जाऊन पाहत होता. या वेळी मागच्या बाजूने बारा चाकी टँकर (एमएच ४१, एयू ४६४६) वरील चालक कुंभकरण (रा. अमेठी, उत्तर प्रदेश) याने मागच्या बाजूने ट्रकला जबर धडक दिली. या धडकेत टँकरचा केबिनचा चुराडा झाला आहे.
या अपघातात चालक कुंभकरण अडकला होता, तर ट्रक खाली असलेला नदीम नसीम खान हा ही ट्रक खाली दाबला गेला. या दोघांना बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयत दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकराम सावकारे यांच्या फिर्यादीवरून टँकर चालक कुंभकरण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरणगाव पोलीस करत आहेत.