जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२४
राज्यात गेल्या काही महिन्यापासून प्रेम प्रकरण मोठ्या चर्चेत येत असतांना या प्रेम प्रकरणातून हाणामारी व खुनाच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच सातारा तालुक्यात प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिले आहे. यामध्ये या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तरूण देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये ही घटना घडली आहे. आरुषी मिश्रा असे मृत तरुणीचे नाव आहे. तर ध्रुव छिक्कर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हे दोघेही कृष्णा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते, ते दोघेही उत्तर भारतीय असल्याची माहिती आहे. किरकोळ वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
31 जुलै रोजी आरुषी आणि ध्रुवमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. संतापाच्या भरात ध्रुवने आरुषीला बिल्डिंगवरून खाली ढकलून दिले. यामध्ये आरूषीचा मृत्यू झाला, तर मारहाणीत ध्रुवदेखील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सुरूवातीला तरूणीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नंतर पोलिस तपासात हत्या झाल्याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
