जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२४
राज्यातील बदलापूर येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिरमधील चार वर्षीय दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून गेल्या मंगळवारी (दि.२०) उद्रेक झाला होता. संबंधित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पालक आणि आंदोलकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यातच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे संतापाचा कडेलोट झालेले पालक आणि आंदोलकांकडून शाळेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवरही उतरला होता. दरम्यान, शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या घरावरदेखील संतप्त आंदोलकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात घराची नासधूस करण्यात आली होती.