जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२४
अमळनेर तालुक्यातील चौबारीजवळ पाडसे रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने आठ वर्षीय मुलीला धडक दिल्याने या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात पळून जाणाऱ्या चालकाला ग्रामस्थांनी पकडून चोप देवून मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता विजय नाईक या आपली मुलगी रेखमा विजय नाईक (वय ८) हिच्यासोबत २६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पाडसे रस्त्याच्या कडेने विहिरीवर पाणी भरण्यास जात होत्या. या वेळी पाडसेकडून चौबारीकडे जाणाऱ्या चारचाकी (एमएच- ०२, बीजे- ५४२०) ने भरधाव वेगाने रेखमा हिला धडक दिली. यानंतर हा वाहनचालक अमळनेरच्या दिशेने पळून गेला. घटना समजताच मुलीचे वडील विजय नाईक व ग्रामस्थांनी मुलीकडे धाव घेत तिला खासगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून तीला मृत घोषित केले. या प्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हे.कॉ. शरीफ पठाण करत आहेत.
दुर्घटना झाल्याचे व चालक पळून गेल्याचे कळताच काही ग्रामस्थांनी अमळनेरकडे धाव घेतली. यानंतर या वाहन चालकाला पकडून चोप दिला. या वेळी मारवड पोलिसांनी या चालकास व वाहनाला ताब्यात घेतले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील विकास प्रकाश वानखेडे (वय २५) असे आरोपी चालकाचे नाव आहे. त्याला काल अमळनेर सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.