जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२४
येथील जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद (मानांकन) टेबल टेनिस स्पर्धा २०२४ चे आयोजन शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे दि. ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. मंगळवारी दि. १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी १९ वर्षाखालील खेळाडूंचे सामने संपले. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
मंगळवारी १९ वर्षाखालील खेळाडूंच्या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी मंचावर सामाजिक कार्यकर्ते विशाल भोळे, माजी नगरसेवक नितीन बरडे, प्रदीप तळवलकर, टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश चौबे, चंद्रशेखर त्रिपाठी, सचिव विवेक अळवणी, खजिनदार संजय शहा, सदस्य प्रा. चारुदत्त गोखले, राजू खेडकर, डॉ. श्रीधर त्रिपाठी, सुनील महाजन उपस्थित होते.
स्पर्धेत मुलींच्या गटात संपदा भिवंडकर हिने अंतिम सामन्यात काव्य भट्ट हिला पराभूत करून विजेतेपद पटकावले. तर मुलांच्या गटात अंतिम सामन्यात जश मोदीचा रिगन अल्बुकर्क याने चुरशीच्या सामन्यात पराभव केला. मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना आमदार चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला आ. राजूमामा भोळे व टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सदिच्छा देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. प्रास्ताविक अड. विक्रम केसकर यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार राजेश जाधव यांनी मानले.