
जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२४
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे रविवारी संध्याकाळी गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात ६ जण गंभीररित्या भाजले गेले असून दोन जण किरकोळ जखमी आहेत. जखमींवर कासोदा, जळगावात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अनिल पुना मराठे हे शेतकरी गढी भागात परिवारासह राहता. रविवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी गॅस सिलेंडरची हंडी संपल्याने नवीन हंडी आणली होती. ती त्यांनी बसवल्यानंतर त्यातून गॅस लिकेज होऊ लागला व गॅसचा भडका झाला. यामुळे अनिल मराठे व त्यांचा परिवार घरा बाहेर पळाला. आजूबाजूच्या ग्रामस्थांना माहिती कळाल्यावर त्यांना वाटले की, शेतकऱ्याच्या कपाशीला आग लागली आहे. त्यामुळे ते घराच्या दरवाजा जवळ गेले असता अचानक घरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.
यात ग्रामस्थ जोरात फेकले गेले असून आठ जण भाजले गेले आहेत. याघटनेची माहिती कळताच इतर ग्रामस्थांनी त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यात ज्ञानेश्वर देवराम पाटील (वय ४५), माधवराव शामराव गायकवाड (वय ३३), शुभम सुरेश खैरनार (वय २५), सुरेश अर्जुन खैरनार (वय ५०), सागर कृष्णा सूर्यवंशी, आबा चव्हाण, नगराज देवराम पाटील, घरमालक अनिल पुना मराठे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान कासोदा पोलीस स्टेशनचे एपीआय राजपूत यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते.





















