
जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२४
पाचोरा शहरातील आठवडे बाजार येथे किरकोळ कारणावरून एका इसमाने महिलेस तलवार दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. सदर महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठत झालेला प्रकार पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना सांगितला असता पो. नि. अशोक पवार यांनी तात्काळ घटनास्थळी पथक रवाना करुन संबंधित इसम व तलवार हस्तगत करत इसमा विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२० रोजी खैरुन बी. अमीर खाटीक, (वय- ५५ वर्ष) रा. बिसमील्ला नगर, बसस्टॅन्ड मागे, पाचोरा या महिलेस सचिन अशोक येवले, रा. महात्मा गांधी रोड, आठवडे बाजार, पाचोरा याने तलवार दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सचिन येवले विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. पो. कॉ. गजानन काळे, सपोनि. दिनेश भदाणे, पोउपनिरीक्षक परशुराम दळवी, पो. हे.कॉ. राहुल शिंपी, पो. कॉ. योगेश पाटील यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.





















