जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गे ६ वर असलेल्या विद्यूत कॉलनीत रहिवासी असलेले ८८ वर्षीय सेवानिवृत्त वृध्दाला एका इन्शूरन्स कंपनीच्या नावाने ६२ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या सात संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना दिल्ली व उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी शुक्रवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी माध्यमांशी बोलतांना दिली.
सविस्तर वृत्त असे की, “विद्यूत कॉलनीतील रहिवाशी टिकाराम शंकर भोळे (वय-८८) यांच्याशी नोव्हेंबर २०१७ ते २५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दिपका शर्मा, अनुराग शर्मा व कमलाकरन रेही असे नाव सांगणाऱ्या अनोळखी इसमांनी इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत स्वतःची ओळख लपवून वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन संपर्क केला होता. आरोपींनी स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून भोळे यांना स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे बनावट कागदपत्रे हे फिर्यादी यांचे जळगाव येथील राहते पत्यावर पाठविले होते.
आरोपींनी भोळे यांना स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगुन तसेच पॉलीसी मध्ये गुंतविलेले पैसे परत मिळण्यासाठी पॅनकार्ड लिमीट वाढविणे, रकमेवरील बँक कमीशन, गव्हर्नमेंटकडुन एनओसी मिळण्यासाठी असे वेगवेगळे कारणे सांगुन वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ६१ लाख ७९ हजार ५९३ रुपये हे वेगवेगळया बँक खात्यामध्ये ऑनलाईन स्विकारुन फसवणूक केली होती.
जळगाव सायबर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासादरम्यान फिर्यादी यांना आलेले ई-मेल, मोबाईल क्रमांक, बैंक खाते, CCTV फुटेज, तसेच इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषन करून जळगाव सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाला रवाना केले होते.
यात पथकाने अमित देवेंद्र प्रकाश सिंग, रा. शाहदरा नार्थ ईस्ट दिल्ली, लखमीचंद राजेश कुमार, रा. जोहरी पुर, दिल्ली, दिपेश कुमार तारकेश्वर सिंग, रा. नवी दिल्ली, अमीत वर्मा रामसिंग वर्मा उर्फ विक्रम सुरेश,रा. नोयडा, उत्तर प्रदेश, राजकुमार कल्याणसिंग उर्फ अनुराग शर्मा, रा. गाजियाबाद उत्तर प्रदेश, रविकुमार यशपालसिंग उर्फ कमलाकर रेड्डी, रा. उत्तर प्रदेश, सोनी यादव पिता कृष्णेंद्रकुमार यादव, रा. दिल्ली, या सात जणांना अटक केली. संशयितांकडून गुन्ह्यातील रक्कम एकुण २० लाख ३० हजार हस्तगत करण्यात आले आहे.” फरार आरोपी अक्षय यादव पिता कृष्णेंद्रकुमार यादव, रा.दिल्ली यांच्या वेगवेगळया बँक खात्यातून १८ लाख ६२ हजार रुपये गोठविण्यात आली आहे. तसेच फरार आरोपी रिटा सहाणी रा. दिल्ली यांचा शोध सुरू असून गुन्हयाचा तपास देखील सुरु आहे.