जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील उतावळी नदी पात्रानजीक शौचास गेलेल्या एका ५६ वर्षीय प्रौढाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तर घटनेनंतर तब्बल ५ दिवसांनंतर नदी पात्रात तरंगत्या अवस्थेत प्रौढाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडा येथील रहिवासी दगडु वजीर तडवी (वय ५६) हे २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या उतावळी नदी पात्रानजीक शौचास गेले होते. बराच वेळ झाला परंतु दगड् तडवी हे परत आले नाहीत त्यामुळे घरातील मंडळींनी शोधा शोध सुरू केली. उतावळी नदी पात्रात ही त्यांचा शोध घेण्यात आला.
मात्र, दगडु तडवी हे कोठेच आढळून आले नव्हते. दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दगडु तडवी यांचा मृतदेह ग्रामस्थांना उतावळी नदीच्या पाण्यात तरंगत्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर दगडु तडवी यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दगडु तडवी यांच्या पश्चात्य पत्नी, २ मुले, मुलगी असा परिवार आहे.