
जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
अमळनेर मतदार संघातून विजयी झालेले आ. अनिल भाईदास पाटलांना पुन्हा मंत्रिपद मिळावे, म्हणून न्यू प्लॉट परिसरातील बहुसंख्य सती माता भक्तांनी ग्रामदैवत सती मातेला साकडे घालून नवस ही मानला आहे. शुक्रवार हा सती मातेचा वार असल्याने यादिवशी सर्व भक्तांनी मंदिरावर जावून देवी समोर बसून आ. अनिल पाटील यांच्या मंत्री पदासाठी उपासना केली.
यात उपस्थित असलेले इतर भक्तगण ही सहभागी झाले होते. दरम्यान, आमदार अनिल पाटील हे देखील सती मातेचे भक्त असून देवीच्या दर्शनासाठी तेही मंदिरावर येत असतात. गेल्या वेळी मंत्री पद मिळाल्यावर ही अनिल पाटील यांनी अमळनेर भूमीत पाय ठेवण्याआधी सती मातेचे दर्शन घेऊन प्रवेश केला होता. आताही नवरात्र उत्सवात त्यांच्या परिवाराने सती मातेच्या शेकडो प्रतिमा तयार करून भक्तांना त्याचे मोफत वितरण केले होते.
दरम्यान, आ. अनिल पाटलांच्या माध्यमातून अमळनेर मतदार संघास प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने मतदार संघाच्या विकासाला मोठी चालना मिळाली होती. सुदैवाने आताही ते निवडून आल्याने मंत्रीपदासाठी पुन्हा त्यांचे नाव चर्चेत आहे. मंत्री पद मतदार संघाच्या विकासासाठी आणि निम्न तापी पाडळसरे धरणासाठी पूर्णत्वासाठी खूपच लाभदायी ठरणारे असल्याने या मंत्रीपदासाठी सती मातेला नवस मानण्यात आला. सर्वांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील, अशा भावना या वेळी उपस्थित भक्तांनी व्यक्त केल्या.




















