जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४
गेल्या काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस गुटखा वाहतूकीवर कारवाई करीत असताना देखील पुन्हा एकदा दिल्लीवरून मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रातून मुक्ताईनगर पासून मुंबई वसई येथे जाणारा गुटक्याने भरलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून एक कोटी 78 लाख 66 हजार 80 रुपये किमतीचा राज्यात बंदी असलेला गुटखा 1 डिसेंबर रोजी पकडण्यात आला. तसेच तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात बंदी असलेल्या प्रतिबंधित गुटखा हा ट्रक क्रमांक (एन एल ०१ ए जे 17 25) हा दिल्लीहून मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून मुक्ताईनगर मार्गे येऊन मुंबई येथील वसई येथे जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील दीपक माळी यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी खात्री करून यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार 1 डिसेंबर रोजी पुर्णाड फाटा येथे सदर ट्रक थांबवून तो तपासला असता त्यामध्ये एक कोटी 78 लाख 66 हजार 80 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला. गुटखा व माल ट्रक व इतर मुद्देमाल असा एकूण दोन कोटी आठ लाख 82 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक माळी, रवींद्र पाटील, मुरलीधर धनगर, सचिन पोळ आदींनी केली. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याची कारवाई प्रथमच झाले असल्याचे बोलले जात आहे.