जळगाव मिरर | संदीप महाले
सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात आज देखील अनेक तरुणांना रोजगार नसल्याने सुशिक्षित तरुण बेरोजगार असून काही तरी अवैध धंद्याकडे वळाले आहे तर काही उच्च शिक्षित तरुण शहरातील छोट्या मोठ्या कंपनीत तुटपुंजा पगारात काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. राज्याच्या मंत्री मंडळात जिल्ह्यातून तीन मंत्र्यांची वर्णी लागली आहे. आता या तीन मंत्र्यांना जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्याचे मोठे आव्हान समोर उभे आहे.
जळगाव जिल्ह्यात अनेक दिग्गज मंडळी शिक्षण क्षेत्रात मोठा ठसा उमटविला आहे मात्र यांच्या शाळेसह महाविद्यालयातील तरुण उच्चशिक्षित असून देखील आज बेरोजगार आहे काही तरुण शहरातील छोट्या मोठ्या कंपन्यामध्ये कमी पैश्यात नोकरी करून आपले स्वप्न मातीत मिसळून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे तर अनेक तरुण अवैध कामात आपली पकड मजबूत करून आपले स्वप्न साकार करीत आहे. तर काही तरुण राजकीय, सामाजिक क्षेत्रात येवून आपआपल्या पद्धतीने पकड मजबूत करीत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी शहरात रोजगार आणणार असल्याचे जनतेला आश्वासन देत होते मात्र अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधीने शहरालगत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली नाही. उलट शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसीतील काही उद्योग बंद होण्याच्या अवस्थेत आले आहे. यावर जिल्ह्यातील तीन मंत्री काही मार्ग काढणार का ? असा प्रश्न सध्या जळगावकर नागरिक विचारू लागले आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या शहराला उद्योगनगरी ओळख मिळणार का ? असा देखील प्रश्न जोरदार चर्चेत येत आहे.
जिल्ह्यात महायुतीचे तीन मंत्री !
राज्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला तर महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात तीन आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी तथा भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व शिवसेनेची मुलुख मैदानतोफ मंत्री गुलाबराव पाटील तर दुसरीकडे भाजपचे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांना देखील महायुतीने मंत्री बनविले आहे. येत्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हे तीन मंत्री जळगाव जिल्ह्यात किती उद्योग आणणार याकडे देखील जनतेचे लक्ष लागून आहे.