जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात चर्चेत येत असतांना या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली असून फरार आरोपींपैकी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती बीड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान फरार तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडलेला नाही. प्रयत्न करून सुद्धा तिसरा आरोपीला पोलिसांना ताब्यात घेता आले नाही.
सविस्तर वृत्त असे कि, केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने न्यायालयात आपल्याला 24 तास मदतीस मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये आपल्याला स्लीप ॲप्निया या नावाचा आजार असल्याचे त्याने म्हटले होते. या आजारात रुग्णाला रोज रात्री ऑक्सिजन सारखी एक मशीन लावली जाते. मात्र ही मशीन ऑक्सिजन नसून रुग्णाला झोप येण्यासाठी लावली जाते. ही मशीन लावण्यासाठी आणि इतर कामासाठी आपल्याला 24 तास मदतीस मिळावा, अशी मागणी वाल्मीक कराडने न्यायालयाकडे केली होती. मात्र, त्याची ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.