चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील आदिवासी गाव अंमलवाडी व परिसरातील पाडे भागात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आदिवासी पाड्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गावात पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. यात बोअरिंग फक्त अर्धा तास चालते त्यामुळे गावकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही ,गावकऱ्यांची तहान भागत नाही, ग्रामस्थांना थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. गावात पाण्याच्या एक हपका आहे पण त्याद्वारे येणारे पाणी दूषित असल्याने ते पाणी पिण्यास योग्य नाही या सर्व बाबींचा विचार गावातील आदिवासी तरुण केदार बारेला याने केल.
सदर पाण्याचा प्रश्न राजकारण्यांच्या माध्यमातून मार्गी लागणार नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने काही एनजीओशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शेवटी अंमलवाडी येथील तरुण केदार बारेला याने गुगलच्या माध्यमातून रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांचा संपर्क नंबर मिळवला व भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून भेटण्याची वेळ मागीतली. प्रत्यक्ष भेटीत आपल्या अंमलवाडी आदिवासी गावातील पाण्याची भीषण समस्या कथन केली व मदत करण्याचे आवाहन देखील केले.
सदर युवकाची गावाबद्दल व पाण्याबद्दल असलेली धडपड व तळमळ पाहून सदर युवकाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांनी अंमलवाडी गावात पाण्यासाठी तातडीने बोअरवेल करून दिल्याने आदिवासी तरुण केदार बारेला व गावकऱ्यांनी रोटरी क्लब ऑफ चोपडा या सेवाभावी संस्थेचे विशेष आभार मानले आहेत.