जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२५
अनेक ठिकाणी विचित्र अपघाताच्या घटना घडत असतांना आता रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटले अन् भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली अन् त्यानंतर पुढे थेट बाजूच्या घरात घुसली. हा विचित्र अपघात जुन्नर तालुक्यातील ओतूर हद्दीतील मोनिका चौकानजिक धोलवड-ओझर-नारायणगाव रस्त्यावर घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कारमधील चारजण किरकोळ जखमी झाले. तसेच घरासह कारचे मोठे नुकसान झाले आहे.
कारमधील जखमींची नावे समजू शकली नाहीत. कार (एमएच १४ बीएक्स ५२९८) ही ओझरकडून ओतूरकडे जात होती. ओतूर हद्दीतील मोनिका चौकानजिक कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यालगत असणाऱ्या दुचाकीला धडकून पत्राशेडवजा घरामध्ये घुसली. कारमधील चौघे किरकोळ जखमी झाले. तर घरासह कारचे मोठे नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, शामसुंदर जायभाये, शुभम काशीद, मयुरी खोसे हे तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना मदत केली.
