जळगाव :प्रतिनिधी
सोन्याच्या दागिण्यासाठी तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनेत रुमालाने गळा आवळून खून करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून संशयित मुकुंदा ऊर्फ बाळू बाबूलाल लोहार (वय-३०) रा. चौधरीवाडा, किनगाव ता. यावल याने तीनही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेली माहिती अशी की, किनगाव येथील राहणाऱ्या ७० वर्षीय वृध्द महिला मराबाई सखाराम कोळी या घरी एकट्या असल्याचा संधीचा फायदा घेत दि. २३ मे रोजी दुपारी ११ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपीने रुमालाने गळा आवळून अंगावरील चांदीचे दागिने चोरून नेला होता. या घटनेत सदरील महिला बेशुद्ध झाली होती, तिला जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दि. २ जून रोजी उपचारादरम्यान वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात खून व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलीसांना घटनास्थळी संशयिताची चप्पल व रुमाल आढळून आले होते. त्यानुसार तांत्रिक बाबी लक्षात घेता त्याची कसून चौकशी केली असता मुकुंदा ऊर्फ बाळू बाबूलाल लोहार (वय-३०) रा. चौधरीवाडा, किनगाव ता.यावल याचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी २७ जून रोजी त्याला ताब्यात घेतले होते. दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता. त्याने धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिली आहे. याच संशयित आरेपीने किनगावातीलच द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (वय-७०), रूख्माबाई कडू पाटील (वय-७०) या दोन वृध्द महिलांचा देखील याच पध्दतीने गळ्यात रूमाल आवळून खून करून दोघांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून पसार झाला होता. या दोन्ही गुन्ह्याचीदेखील कबुली दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, सहायक पोलिस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करून गुन्ह्याचा शोध घेण्याची सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक फौजदार वसंत लिंगायत, युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, सुनील दामोदरे, दीपक पाटील, संदीप सावळे, पोलीस नाईक किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, राहुल पाटील, पोहेकॉ ईश्वर पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.