सोलापूर : वृत्तसंस्था
‘आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. ही आमची राजकीय चळवळ आणि संघर्ष आहे. आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही हा लढा लढत आहोत. आमच्यावर दबाव टाकून कोणीही या ठिकाणी घेऊन आलेले नाही. कोंढलं नाय, मारलं नाय, हाणलं नाय. अफवा पसरवू नका. आम्ही जे आलो आहेत, ते स्वखुशीने आलो आहोत. ’ असे स्पष्टीकरण शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले आहे.
गुवाहाटीमध्ये तळ ठोकून बसलेले बंडखोर शिवसेना आमदार आपण तिकडे का गेलो, याबाबतचे स्पष्टीकरण देत आहेत. त्यानुसार आज आमदार शहाजी पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमदार पाटील म्हणाले की, आम्ही ४० आमदारांनी मिळून एकजुटीने, विचार करून एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला आणले आहे. आमच्या मतदारसंघातील जनता आणि आमचं आमच्या मतदारसंघातील भविष्याचं राजकारण वाचवा, अशी विनंती आम्ही शिंदे यांना केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमचं राजकारण उद्ध्वस्त होतंय.
खून करणाऱ्या ‘त्या’ सिरीयल किलरला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
आम्ही जनतेच्या समोर जात असताना आणि मतं मांडत असताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मत द्या, असे आवाहन केले होते. तसेच, त्यावेळी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांचं नाव घेत जनतेसमोर जाऊन मते मागितली होती. लोकांनी आम्हाला भरभरून मते दिली. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत सांगोल्यात शिवसेनेला १६०० मते होती. मी २०१३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१४ च्या निवडणुकीत ७६ हजार मते केली. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत एक लाख मतं घेत भाई गणपतराव देशमुख यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा रोवला आणि मी विजयी झालो, असेही शहाजी पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.




















