जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२५
सोन्यात गुंतवणुकीचे अमिष दाखवून आपल्या सहकाऱ्यांची फसवणुक करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची अलिशान कार तिचा मित्र मिरखॉ तडवीच्या भावाच्या घरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, अर्चना पाटील यांची न्यायालयीन कोठडीत तर मिरखॉ तडवीला पाच दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सोन्यामध्ये गुंतवणुकीवर अधिकचे अमिष दाखवून अर्चना पाटील या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांसह इतर नागरिकांना लाखो रुपयात गंडविले आहे. याप्रकरणी शहर व रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अर्चना पाटील व तिचा मित्र मिरखॉ तडवी या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गेल्या पंधरा दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अर्चना पाटील यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून अटकेत असलेल्या तिच्या मित्राला पाच दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला पोलीस अर्चना पाटील यांनी तिचा मित्र मिरखॉ तडवी याच्या बँक खात्यावरून अनेकांना पैशांची देवाण घेवाण केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, अर्चना पाटील वापरत असलेली (एमएच १९, डीव्ही ७९३७) क्रमांकाची अतिशान कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली. ही कार मिरखॉ तडवी याच्या नावार असल्याची चर्चा आता पोलीस दलात सुरु झाली आहे.