जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२५
गेल्या अनेक वर्षापासून पुणे शहराची ओळख विद्येचे माहेर घर म्हटले जाते मात्र सध्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनेमुळे नेहमीच चर्चेत येत असतांना आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. ती दुपारी समोर आली. या घटनेमुळे पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती बुधवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर थांबली होती. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचे सांगितले. पण तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावर तरुणीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये नेले. तिथे त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तेथून पळ काढला. या घटनेमुळे हादरलेल्या तरुणीने आपल्या मित्राला फोनवरून ही घटना सांगितली. त्यानंतर मित्राने तिला तत्काळ पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. तद्नुसार तरुणीने स्वारगेट पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. या घटनेची वाच्यता होताच पुण्यात एकच खळबळ माजली.
पोलिसांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. सध्या तो फरार आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या मागावर निघाले आहेत. त्याला लवकरच अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील एक सुरक्षित बसस्थानक समजले जाते. तिथे 24 तास प्रवाशांची वर्दळ सुरू असते. त्यानंतरही तिथे ही घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
