
जळगाव मिरर | ३ मार्च २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आता मध्य प्रदेशातील चापोरा – दापोरा याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील रहिवासी विश्वजीत उर्फ भागवत विनोद पाटील या तरुणाचा मध्य प्रदेशातील भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विश्वजीत हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या दोन बहिणी आहेत. शेतीच्या काही कामानिमित्त तो दिनांक २ मार्च २०२५ रोजी आपल्या मित्रासोबत बऱ्हाणपूर येथे गेला होता. दरम्यान, मध्य प्रदेशातील चापोरा – दापोरा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला.
विश्वजीत हा तालुक्यात सर्वत्र ओळखला जाणारा, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाचा तरुण होता. त्याच्या अकाली निधनाने मित्रमंडळी आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर आणि मित्रांवर मोठा आघात झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.