जळगाव मिरर | ११ मार्च २०२५
देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असतांना आता यावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठं विधान केलं आहे.
जेव्हा आमच्याकडे ( महाराष्ट्रात) छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा गावचा एका पाटील होता. त्याने एका तरूणीवर बलात्कार केला. ते दुष्कृत्य समोर येताच शिवाजी महाराजांनी थेट आदेश दिला. ‘अत्याचार करणाऱ्याला जीवे मारू नका, त्याचे हात-पाय तिथल्या तिथे तोडा’, असे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. मरेपर्यंत तो (पाटील) तशाच अवस्थेत राहिला, असे सांगत बागडे यांनी शिवरायांच्या त्या शिक्षेचा दाखला दिला.
महिलांवर अत्याचार होत असताना लोक व्हिडिओ बनवतात. हे योग्य नाही, असेही राज्यपाल म्हणाले. एखाद्या महिलेचा विनयभंग होत असेल तर त्या पुरुषाला पकडा. तो माणूस आहे, तुम्हीही माणूस आहात आणि तुमच्यासोबत आणखी 2-4 लोक मदतीला येतील. विनयभंग करणाऱ्याला किंवा बलात्कार करणाऱ्याला रोखावे, मारहाण करावी, ही मानसिकता जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही, असेही त्यांनी नमूद केलं.
गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही हेच कळत नाही. मात्र 12 वर्षांखालील मुलाचा कोणी विनयभंग केला, बलात्कार केला किंवा लैंगिक अत्याचार केले, तर त्याची शिक्षा फाशीची आहे, तरीही असे गुन्हे थांबत नाहीत आणि अशा प्रकरणांची रोजच सुनावणी होताना दिसते, असे हरिभाऊ बागडे म्हणाले. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचे यावरून दिसून येते. कायद्याच्या भीतीसाठी काय करावे, तुम्ही कल्पना तरी करू शकता का ? तुम्ही सूचना देऊ शकता, कायदा असतानाही अशा घटना का घडतात? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असेही बागडे यांनी नमूद केलं.