जळगाव मिरर | १२ मार्च २०२५
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी परकीय आक्रमकांशी संघर्ष करून स्वराज्य उभे केले. स्वराज्य उभारणी आणि विस्तारात आपल्या प्रभावशाली नेतृत्त्वाने योगदान देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी असल्याचे मत डॉ. नरसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव यांच्या सहकार्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित ‘विद्वत्ता परिषद व सांस्कृतिक कार्यक्रम’प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले, इ.स. १७३४ साली होळकर घराण्याचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या कर्तृतवाने प्रेरित होऊन अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार सुरु केला. महाराष्ट्राच्या सीमेबाहेर माळवा प्रांतापर्यंत आपले राज्य विस्तारले. त्यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, जिद्द आणि समर्पणवृत्ती यामुळे तब्बल २९ वर्ष त्यांनी यशस्वी राज्यकारभार केला असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी स्थानिक वतनदारांना वतने दिली. दीनदुबळ्या माणसांना मदत केली. ‘गो’पालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून आपण प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे.
प्रा. गोपीचंद धनगर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. वयाच्या नवव्या वर्षापासून आपल्या कर्तृत्वाने सर्वांनाच प्रेरित करणाऱ्या अहिल्याबाईंच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. मात्र त्या सर्व परिस्थितीवर मात केली. शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सर्वसामान्य जनतेला सर्वतोपरी मदत केली असे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीच्या कार्यक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्राचा इतिहास, कला-संस्कृती या क्षेत्रात देदीप्यमान आहे. त्यात अहिल्यादेवींचे योगदान अमूल्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. पवित्रा पाटील यांनी केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना डॉ.पवित्रा पाटील यांनी असे सांगितले की, अत्यंत कमी वयात आपल्या राज्यकारभाराची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व अफाट होते. त्यांच्या चरित्रातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या उपप्राचार्या प्रा. सुरेखा पालवे होत्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, आलेल्या परिस्थितीला धैयाने सामोरे जाऊन अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकर्ती म्हणून आदर्शवत काम केले. त्यांनी श्रमाचे मूल्य जाणले. महेश्वर साडीच्या निर्मितीची प्रेरणा देऊन औद्योगिक धोरणाची चुणूक दाखविली. त्यांची निरीक्षणशक्ती, चाणाक्षपणा हे गुण आपण आत्मसात करून आपण सर्वांनी वाटचाल करणे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शाहीर शिवाजीराव पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकर्तृत्त्वावर आधारलेला पोवाडा सादर केला.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार साहेबांच्या विशेष संकल्पनेतून या विद्वत्ता परिषदेचे आयोजन राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे समन्वयक मा. विनोद ढगे यांनी प्रास्ताविक केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा पोवाडा सादर केला. यावेळी अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसूर, डॉ. देवानंद सोनार, प्रा. पंडित चव्हाण, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ. मनोज महाजन, प्रा. गोविंद पवार, प्रा. डॉ. विद्या पाटील. प्रा. विलास धनवे, डॉ. विजय लोहार, डॉ. जयेश पाडवी, प्रा. रेणुका झांबरे, प्रा. वर्षा उपाध्ये, प्रा. कीर्ती सोनवणे, प्रा. सुनिता तडवी तसेच इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश महाले यांनी केले.